jejurikar.inजयदीप जेजुरीकर • लेख आणि गोष्टी
← गोष्टींच्या वहीकडे

दिवाळी विशेष / अंक ०१

आमच्या जिभेवर मातृसत्ता!

जयदीप जेजुरीकर · दिवाळी २०२६

दिवाळीचा फराळ — संदर्भ छायाचित्रांवर आधारित कल्पित रेखाचित्र

दिवाळी जवळ आली की महाराष्ट्रीय घरात डब्यांची प्रतिष्ठा एकदम वाढते. वर्षभर बिस्किटं ठेवणारा डबा चकल्यांना मिळतो. चिवड्यासाठी मोठा डबा निघतो. लाडू, करंज्या, शंकरपाळे, अनारसे यांचीही सोय होते. आणि हे सगळं कुठे ठेवलंय, याची माहिती घरातल्या प्रत्येकाला असते. स्वतःचा रुमाल सापडत नसला तरी चकलीचा डबा अंधारात सापडतो.

फराळात प्रत्येक पदार्थाचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व असतं. चकली तिखटामिठाची, काटेरी; करंजी नाजूक, आतलं सहज कळू न देणारी. लाडूला आकाराची शिस्त असते. चिवड्याला तसं बंधन नाही. त्यातही शेंगदाणे आणि काजू आधी वेचून खाणारी मंडळी असतात. मग उरलेल्या पोह्यांना ‘हलका आहार’ म्हणून मान्यता मिळते.

आपल्याकडे फराळ खात नाहीत; आधी ‘बघतात’. एक चकली घेऊन, “बघू, कशी झालीये,” म्हणायचं. मग दुसरी घेऊन पहिल्या मताची खात्री करायची. तिसरी चहाबरोबर. चौथी तुटलेली असते—ती मोजायची नसते.

आमच्यासारख्या एकत्र कुटुंबात या तपासणीसाठी माणसांची कमतरता नसते. सल्लेही भरपूर असतात. “थोडं तिखट हवं होतं”, “गोड अगदी बरोबर आहे”, “आणखी जरा खुसखुशीत…” पदार्थ करता येणं ही मत देण्याची अट नसल्यामुळे चर्चेत सगळ्यांना भाग घेता येतो.

माझीही मतं ठाम असतात. चकली कुरकुरीत हवी, कडक नको. तेलकट नको, पण कोरडीही नको. बाहेर काटे हवेत आणि आत हलकीशी पोकळी. घास घेतल्यावर सहज मोडली पाहिजे; दातांची परीक्षा घेता कामा नये. इतक्या अटी ऐकून कुणाला वाटेल, याला चकली बनवता येत असणार.

मला डबा उघडता येतो.

पण आईची चकली खाल्लेली असल्यामुळे तेवढ्याच पात्रतेवर मी आजही मत देतो.

ती चकली नेमकी कशी होती हे मला आजही सांगता येतं. तिचा खमंगपणा, कुरकुरीतपणा, तोंडात तेलकटपणा न राहणं—सगळं आठवतं. पण ती तशी करायची कशी, हे विचारलं तर माझं ज्ञान संपतं.

माझ्याकडे चवीची आठवण आहे. पाककृती नाही.

ही परिस्थिती निर्माण करण्यात एकट्या आईचा हात नाही. पातळ पोह्यांच्या चिवड्याच्या बाबतीत माझी आजी सुमतीही तितकीच जबाबदार आहे.

पातळ पोह्यांचा चिवडा दिसायला साधा. पण करणाऱ्याची परीक्षा घेणारा. पोहे कधी आक्रसतात, तर कधी तेलाचा बेत चुकतो. आजीच्या चिवड्यात मात्र पोहे छान मोकळे, हलके आणि कुरकुरीत. तेल अगदी हवं तेवढंच. आणि तो खास हिरवट झाक असलेला चमकदार पिवळा रंग! डबा उघडल्यावर आधी डोळे खायचे, मग आम्ही.

अशा चिवड्याचा एक तोटा असतो. किती खाल्ला, याचा अंदाज लागत नाही. वाटी रिकामी झाली की आपण फार काही खाल्लेलंच नाही, असं प्रामाणिकपणे वाटतं. आजीने चिवडा हलका केला होता; मनावर ओझं घ्यायचं नाही, एवढाच अर्थ आम्ही घेतला.

आजीची बहीण, आमची नंदा आजी. तिच्या रव्याच्या लाडवांचा विषय तर स्वतंत्र आहे. रव्याचा लाडू करताना पाक साधणं ही खरी कला. तो जरा चुकला की लाडू खायचा की त्याने दिवाळीच्या सुट्टीत क्रिकेट खेळायचं, असा प्रश्न पडू शकतो. गोल आकार दोन्हीकडे उपयोगी पडतोच.

पण नंदा आजीचे लाडू नेहमी नेमके जमायचे. आकार धरून राहणारे, पण घास घेताना सहज मोडणारे. पाकाला तार यायची; आमच्या दातांवर प्रसंग नाही.

आईची चकली, आजीचा चिवडा आणि नंदा आजीचे लाडू—अशी लहानपणापासून सोय असेल, तर पुढे जीभ लाडावण्यात आपला दोष किती?

मी फक्त वेळेवर वाटी घेऊन हजर होतो.

खरं तर त्यांनी चांगलं खाऊ घातलं आणि मी ते स्वतःचं कर्तृत्व समजून बसलो. आपल्याला उत्तम खाणं आवडतं म्हणजे आपल्याला त्यातलं उत्तम कळतं, हा सोयीचा समज मी बराच काळ जपला आहे.

त्यात मी खाण्याच्या बाबतीत इतका चोखंदळ की दुसरीकडे खाणंच टाळतो. त्यामुळे माझ्या जिभेचा अनुभव मर्यादित आहे; आत्मविश्वासाला मात्र त्याची अजिबात कल्पना नाही.

त्या आत्मविश्वासाची उलटतपासणी झाली, तर माझी उत्तरं साधारण अशी असतील—

“नेमकं काय वेगळं होतं?”

“अगं, चव!”

“म्हणजे तिखट कमी-जास्त?”

“तसं नाही.”

“मग भाजणी वेगळी होती?”

“ते माहीत नाही.”

“मग?”

“आई करायची तसं होतं!”

यापुढे चर्चा नेण्यासाठी माझ्याकडे माहिती नसते. भावना मात्र भरपूर असतात. त्या मी अगदी आत्मविश्वासाने मांडतो.

आईनंतर घरातल्या या चवीचा वारसा माझी काकू दीप्ती प्रेमाने पुढे नेत आहे. तिच्यासमोर माझ्यासारखा खाणारा असणं ही सोपी गोष्ट नाही. “आई करायची तसं” ही सूचना म्हणजे पत्ता न देता “आमचं घर लगेच सापडेल” असं सांगण्यासारखं आहे.

तरी दीप्तीकाकूला मार्ग सापडतो. तिच्या हातच्या पदार्थांतून घरची चव पुढे चालू आहे. त्यामागे तिचा वेळ, मेहनत आणि प्रत्येकाची आवड जपण्याची तयारी आहे. माझं योगदान तुलनेने सोपं आहे—आवड कायम ठेवणं.

ही आवड घेऊनच मी लग्न केलं. मयुरीच्या आयुष्यात मी आलो. माझ्यासोबत “आमच्याकडे असं करतात” हेही आलं.

हे वाक्य लग्नातल्या सामानात मोजत नाहीत. पण संसारात जागा भरपूर व्यापतं.

मयुरी व्यावसायिक रंगमंच कलाकार. रंगमंचावर संहिता असते, तालमी असतात, दिग्दर्शकाला काय हवंय ते विचारता येतं. माझ्या खाण्याच्या अपेक्षांची संहिता मात्र माझ्याही हातात नाही. फक्त प्रयोग झाल्यावर सूचना सुचतात!

तिच्या अभिनयकौशल्याचा कस मी “छान झालंय, पण…” म्हटल्यावर लागत असणार.

पण स्वयंपाकाच्या या नव्या प्रांतातही तिने कला छान आत्मसात केली. आई, आजी आणि दीप्तीकाकू यांच्याकडून शिकत तिच्या स्वतःच्या हातालाही उत्तम चव आली आहे. तिची आई वृषालीही उत्तम सुगरण. चांगल्या खाण्याची परंपरा तिला माहेरूनच मिळाली होती.

सासरी मिळाला तो समीक्षक.

आता ती इतकं छान करते की माझ्यातला परीक्षक आणि खाणारा यांचं कधीकधी एकमत होत नाही. परीक्षकाला “अजून जरा…” म्हणायचं असतं. तोवर खाणाऱ्याने दुसऱ्यांदा वाढून घेतलेलं असतं.

माझ्या मतापेक्षा माझ्या ताटावर विश्वास ठेवावा, हे घरच्यांना कधीच समजलं आहे.

पण आईच्या हातची चव आठवते, तेव्हा या सगळ्या परीक्षणापलीकडचं बरंच काही आठवतं.

आमच्या घरात एवढी माणसं, त्यांच्या एवढ्या आवडी. कुणाला काय आवडतं हे लक्षात ठेवणंसुद्धा स्वतंत्र काम आहे. आई ते करायची. आम्ही मात्र तिच्या या कौशल्याचा फार सोयीचा अर्थ लावला होता—आपल्याला आवडतं म्हणजे तिने करायलाच हवं. आपल्या आवडीचा पदार्थ समोर आला की आम्हाला आश्चर्य वाटायचं नाही. ज्या दिवशी नसेल, त्या दिवशी विचारायचो!

आज वाटतं, आम्ही तिच्या स्वयंपाकाचं कौतुक केलं असेल; पण तिच्या लक्षात ठेवण्याच्या ताकदीचं पुरेसं केलं नसावं. प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची इच्छा, कुणासाठी काय बाजूला ठेवायचं, कुणाला आणखी आग्रह करायचा—तिच्या डोक्यात सगळा हिशेब असायचा. आमच्याकडे फक्त भूक असायची.

तिचा स्वभावही तसाच होता. स्वतःची सोय मागे ठेवून दुसऱ्यासाठी करायची तयारी. कुणाचं चुकलं तरी सहज माफ करणं. तिने आमच्यासाठी किती केलं, याचा पूर्ण हिशेब तिच्याकडेही नसावा. केलं त्याची आठवण करून देत बसणं तिच्या स्वभावात नव्हतंच.

आमचं बरं होतं. प्रेम मिळायचं आणि आवडीचं खायलाही मिळायचं. हे दोन्ही घडवण्यासाठी कुणीतरी किती कष्ट घेतंय, याचा विचार करण्याची गरज पडली नव्हती.

पाककृती विचारून ठेवाव्यात, असंही तेव्हा सुचलं नाही. इतकी दूरदृष्टी असती, तर आज उपयोग झाला असता. तेव्हा माझा पुढचा विचार साधारण पुढच्या घासापर्यंतच असायचा.

आता काही पदार्थ आठवतात, पण ते पुन्हा तसे करण्यासाठी नेमकं काय करायचं, हे माहीत नाही. तिचं एखादं साधं रोजचं खाणंसुद्धा तिने केलं की वेगळंच लागायचं. पदार्थ तेच असायचे. तिच्या हातची चव वेगळी असायची.

ती आठवण सांगताना “काहीतरी कमी आहे” एवढंच बोललं जातं. समोरचा पदार्थ कमी पडलेला नसतो. त्याच्यासोबत आपल्याला आठवणारं सगळं त्यात असू शकत नाही, एवढंच.

आणि माझीही थोडी लबाडी आहेच. आईच्या हातची प्रत्येक गोष्ट आठवणीत ताजी, खमंग आणि अगदी योग्य प्रमाणात आहे. आठवणीला पुन्हा तळावं लागत नाही, त्यामुळे तिची एकही खेप बिघडत नाही!

हे कळतं. तरी जीभ ऐकत नाही.

यंदाही घरात फराळ असेल. आजीच्या चिवड्याची चर्चा होईल, नंदा आजीच्या लाडवांची आठवण निघेल. दीप्तीकाकू, मानसी आणि मयुरीच्या हातचे पदार्थ समोर येतील. गप्पांच्या ओघात आईचाही विषय निघेल. कुणाला तिच्या हातचा एखादा पदार्थ आठवेल. मला बहुतेक आणखी एक.

तिच्याबद्दल बोलताना फक्त हळवं व्हावं, असं थोडंच आहे? तिच्या हातचं आठवलं की मला आजही आधी भूक लागते.

मग मी वाटी पुढे करतो.

मातृसत्तेची धुरा घरात पुढे चालली आहे. मीही माझी जागा सोडलेली नाही.

आमच्या जिभेवर अजूनही मातृसत्ता आहे. आणि जीभ आमची असली, तरी तिथे आमचं काही चालत नाही!

← लेखसंग्रह